
पावसाच्या व्यत्ययामुळे कमी धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात बंगळुरू रॉयल्स चॅलेंजर्सने लखनौ सुपर जायंटस्चा 18 धावांनी पराभव करीत गुणतालिकेत पाचवे स्थान संपादले. बंगळुरूने विराट कोहली (31) आणि फाफ डय़ु प्लेसिस (44) यांच्या 62 धावांच्या सलामीमुळेच 20 षटकांत 9 बाद 126 अशी मजल मारली. मात्र कमी धावसंख्येच्या सामन्यात लखनौचा पूर्ण संघ 108 धावांतच बाद झाला.
लखनौकडून कृष्णप्पा गौतमने सातव्या क्रमांकावर येऊन 23 धावांची सर्वोच्च खेळी केली. लखनौने 77 धावांतच आपले 8 फलंदाज गमावले होते. तेव्हा अमित मिश्रा आणि नवीन-उल-हकने 4 षटकांत 26 धावांची भागी करून संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण ते अपुरे पडले. हेझलवूडने 15 धावांत 2 तर कर्ण शर्माने 20 धावांत 2 विकेट टिपले. त्याआधी बंगळुरूच्या डावात कोहली आणि डय़ु प्लेसिसनंतर दिनेश कार्तिकच्या 16 धावा सोडल्या तर त्यांचे अन्य आठ फलंदाज दोनअंकी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. नवीन-उल-हकने प्रभावी मारा करताना 30 धावांत 3 विकेट घेतले. रवी बिश्नोई आणि अमित मिश्राने प्रत्येकी दोन विकेट टिपल्या.



























































