पंचांशी हुज्जत विराटला पडली महागात; ‘बीसीसीआय’ने सामना शुल्कातील 50 टक्के दंड ठोठावला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीला रविवारी (दि. 21) मैदानावर पंचांशी घातलेली हुज्जत चांगलीच महागात पडली. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘बीसीसीआय’ने त्याच्या सामना शुल्काच्या 50 टक्के दंड ठोठावला.

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 36व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघावर 1 धावेने थरारक विजय मिळवला. या लढतीदरम्यान विराट कोहली व पंचांमधील हुज्जत बघायला मिळाली होती. या सामन्यात ज्या चेंडूवर कोहली बाद झाला त्या चेंडूवरून त्याला मैदानावरील पंचांशी वाद झाला. सलामीला उतरलेल्या विराटला तिसऱया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हर्षित राणाने बाद केले. त्याने टाकलेल्या फुलटॉसवर त्याने स्वतःच विराटचा झेल टिपला होता. मात्र विराटच्या म्हणण्यानुसार हा चेंडू त्याच्या पंबरेच्या वर होता. त्यामुळे नो बॉलसाठी त्याने रिह्यू घेतला. या वेळी थर्ड अंपायर मायकल गॉफ यांच्या मते तो चेंडू विराटच्या पंबरेच्या खाली होता. तसेच रिह्यूमध्ये बॉल ट्रकिंगमध्येही असे दिसले की जर विराट क्रिजमध्ये उभा असता तर तो चेंडू त्याच्या पंबरेच्या खाली असता. त्यामुळे हा चेंडू वैध ठरवण्यात आला. या घटनेनंतर विराट पॅव्हेलियनमध्ये परत जाताना चिडला होता. या वेळी त्याचे मैदानावरील पंचांबरोबरही भांडण झाले होते.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार त्याने आयपीएलच्या आचार संहितेतील कलम 2.8च्या अंतर्गत लेव्हल 1ची चूक केली आहे. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्याने ही चूक मान्य केली आणि कारवाईही मान्य केली आहे.