
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये दुसरा क्वालिफायर सामना आज पंजाबच्या महाराजा यादवसिंग क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यत जो संघ विजयी होईल, तो संघ 31 मे रोजी होणाऱ्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला भिडेल. आजच्या सामन्यात चाहत्यांच्या नजरा वैभव सूर्यवंशीच्या फंलदाजीवर असणार आहेत. मात्र, चुकून जर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर काय होईल, कोणता संघ फायनलमध्ये जाईल?
जर गुजरात आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, तर सामनाधिकारी त्याच दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. यासाठी कट-ऑफ वेळेत 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळही जोडला गेला आहे. मुख्य म्हणजे, दोन्ही संघांमध्ये किमान 5-5 ओव्हर्सचा खेळ व्हावा असा प्रयत्न केला जाईल. परंतु, सततच्या पावसामुळे 5 ओव्हर्सचा सामनाही घेणे शक्य झाले नाही, तर अखेर हा सामना रद्द घोषित केला जाईल.
जर क्वालिफायर 2 चा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला, तर थेट पॉइंट्स टेबलचाआधार घेतला जाईल. आयपीएलच्या नियमांनुसार, सामना रद्द झाल्यास पॉइंट्स टेबलमध्ये वरच्या स्थानावर असलेल्या संघाला विजयी घोषित करून फायनलचे तिकीट दिले जाते. या हंगामात गुजरात टायटन्सचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर होता, तर राजस्थान रॉयल्सचा संघ चौथ्या स्थानावर होता. त्यामुळे सामना रद्द झाल्यास गुजरात टायटन्स थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि राजस्थानचे आव्हान संपुष्टात येईल.


























































