
मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील 10 ग्राऊंड्समन, बीसीसीआयच्या आयोजन समितीतील सहा सदस्य तसेच नितीश राणा, अक्षर पटेल व आता देवदत्त पडीकल या क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे 9 एप्रिलपासून हिंदुस्थानात खेळवण्यात येणाऱया आयपीएलवर मोठे संकट कोसळले आहे.
पण आयपीएल स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली असून खेळाडूंसह सपोर्ट स्टाफसाठी बायो बबल (जैव सुरक्षित वातावरण) तयार करण्यात आले आहे. तसेच आयपीएलमध्ये सहभागी होणाऱया खेळाडूंचे लसीकरण करण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे. आरोग्य मंत्रालयाशी याबाबत चर्चाही करण्यात आली आहे. अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी दिली.
खेळाडूंच्या आरोग्याची काळजी
राजीव शुक्ला यावेळी म्हणाले, हिंदुस्थानात कोरोना वाढत आहे. तसेच हा संसर्गजन्य आजार आहे. तो कधी थांबेल हे कुणालाही माहीत नाही. अशा परिस्थितीत क्रिकेटपटूंच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी खेळाडूंना लस देण्याची गरज आहे. आरोग्य मंत्रालयाशी याबाबत बोलणी सुरू आहेत, असे राजीव शुक्ला यावेळी म्हणाले.
सावधगिरी बाळगतोय
हिंदुस्थानात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. पण बीसीसीआय यासाठी सज्ज आहे. आयपीएलमधील लढतींसाठी सहा स्थळ निश्चित करण्यात आली होती. या सहाही ठिकाणी बायोबबल तयार करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक संघांतील सदस्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. खेळाडूंसह प्रत्येकाची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. प्रत्येक टप्प्यावर सावधगिरी बाळगली जात आहे, असे राजीव शुक्ला यावेळी सांगतात.
याचा विचार होऊ शकतो
आयपीएलशी संबंधित फ्रेंचायझी, स्टाफसह सर्वांचीच दररोज कोरोना चाचणी करण्याचा विचार करण्यात येऊ शकतो. सध्या दर तीन दिवसांनंतर ही चाचणी करण्यात येत आहे.
वानखेडे स्टेडियममधील ग्राऊंड्समनना कोरोनाची लागण झाली आहे. यापुढे अशी घटना घडू नये यासाठी ग्राऊंड स्टाफसाठीही विशेष बायो बबल तयार करण्यात येऊ शकतो.
आयपीएलमध्ये सहभागी होणाऱया संघांतील खेळाडू जेव्हा एका शहरातून दुसऱया शहरात जातील तेव्हाही विमान प्रवासादरम्यान त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. यावेळी प्रत्येक राज्य सरकार व एअरपोर्ट ऑथोरीटीसोबत बीसीसीआयला चर्चा करावी लागू शकते.
आयपीएलशी संबंधित एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास किंवा लक्षणे सापडल्यास त्वरीत मेडिकल टीमशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करायला हवा. अन्यथा हा संसर्ग वाढू शकतो.
मुंबईतील लढती हलवण्याचा निर्णय अद्याप नाही
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 10 ते 25 एप्रिलदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱया लढतींच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत राजीव शुक्ला म्हणाले, मुंबईतील स्टेडियममध्ये आयपीएल लढतींसाठी सज्ज झाले आहे. सध्या तरी येथील लढती इतरत्र हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत. यापुढे जर स्थळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्यास लखनौ, हैदराबाद व इंदोर यांच्यापैकी एका ठिकाणी या लढती खेळवण्यात येतील, असे राजीव शुक्ला यावेळी म्हणाले.



























































