युद्ध थांबले, होर्मुझ उघडणार; इराण-अमेरिका शांतता कराराची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या तीन महिन्यांपासून जगाच्या तोंडचे ‘तेल’ पळवणारे इराण-अमेरिकेतील युद्ध अखेर आज थांबले. इराण-अमेरिकेने शांतता करार करत युद्ध कायमस्वरूपी थांबवण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर तेल वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यात आली असून संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला आक्षेप घेत सुरुवातीला इस्रायलने युद्धास सुरुवात केली. त्यानंतर अमेरिकेनेही त्यात उडी घेतली. इराणने या युद्धात तेलाचा शस्त्र म्हणून वापर केल्याने परिस्थिती बिकट झाली. अमेरिकेनेही होर्मुझभोवती डेरा टाकून त्यास प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या युद्धाला अमेरिका विरुद्ध इराण असेच स्वरूप आले होते. पहिले 40 दिवस  हल्ले-प्रतिहल्ले केल्यानंतर शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर गेले दोन महिने शांतता करारावर वाटाघाटी सुरू होत्या. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे चिंता वाढली होती.

इराणसोबत करार पूर्ण झालाय. सर्वांचं अभिनंदन. आता होर्मुझ टोलमुक्त आणि खुले असेल. नाकेबंदी उठवण्याचे आदेशही मी नौदलाला दिलेत. जगभरातील जहाजांनो, तुमचे इंजिन सुरू करा. तेल वाहू द्या!

डोनाल्ड ट्रम्प ‘या’ मुद्दय़ांवर एकमत

  • लष्करी कारवाया थांबवणार
  • होर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार
  • इराणभोवतीची सागरी नाकेबंदी अमेरिका उठवणार
  • इराण आण्विक शस्त्रास्त्रांची निर्मिती बंद करणार
  • लेबनॉनवरील हल्ले थांबवणार
  • इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त होणार

इस्रायलला करार अमान्य

‘हा करार मान्य नाही. देशाची व नागरिकांची सुरक्षा ही आमची पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे लेबनॉन, गाझा आणि सीरियातून इस्रायली सैन्य हटवले जाणार नाही. आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडून निर्णय घेण्याचा मोठा फटका यापूर्वी इस्रायलला बसला आहे. ती चूक पुन्हा होणार नाही,’ असे इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज यांनी स्पष्ट केले.