
संपूर्ण जगाच्या नजरा रोखलेल्या इराण-अमेरिका शांतता कराराचा पेच अद्यापही सुटलेला नाही. युद्धबंदी कायम असली तरी होर्मुझचा मार्ग आणि इराणकडे असलेल्या युरोनियमवरून चर्चा अडली आहे. इराणला कदापि अण्वस्त्रs बनवू देणार नाही, अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे, तर कोणत्याही परिस्थितीत युरेनियम देणार नसल्याची ठाम भूमिका इराणने घेतली आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची मुदत वाढविणे आणि होर्मुझचा मार्ग खुला करण्याबाबत आजच करार होण्याचा दावा करण्यात येत होता, मात्र ती शक्यता मावळली आहे. अनेक मुद्दय़ांवर संमती झालेली नाही. त्यामुळे करारास वेळ लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराकडे जगाच्या नजरा रोखलेल्या आहेत. या कराराचा आराखडा तयार आहे, मात्र दोन मुद्दय़ांवरून पेच सुटलेला नाही. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास तयारी दर्शविली आहे, मात्र युरेनियम सोपवण्यास ठाम नकार दिला आहे. आण्विक मुद्दा हा सध्याच्या कराराचा भाग नाही. त्यामुळे अमेरिकेसोबतच्या प्राथमिक करारामध्ये हा मुद्दा समाविष्ट नाही, असे इराणने स्पष्ट केले. युरेनियमचा साठा अमेरिकेला सोपवण्यास सहमती असल्याचा दावाही इराणने फेटाळला.
ओबामांसारखा करार करणार नाही
इराणसोबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारखा करार करणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ओबामा यांनी केलेला अणुकरार हा सर्वात खराब करारांपैकी एक होता. या करारामुळेच इराणला अण्वस्त्र बनविण्याची संधी मिळाली, असा आरोप ट्रम्प यांनी केला.
इराणवरील कच्च्या तेलाचे निर्बंध अमेरिका उठवणार
शांतता करार झाल्यानंतर इराणवरील कच्च्या तेलासंदर्भातील निर्बंध अमेरिका उठवेल, अशी अट आहे. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱया जहाजांची संख्या 30 दिवसांच्या आत युद्धपूर्व पातळीवर आणण्याचीही अट आहे. मात्र कोणत्याही परिस्थिती अमेरिकेसोबत एकतर्फी करार मंजूर केला जाणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे.

























































