
सध्या सर्वांना एकच काळजी आहे की लॉकडाऊन लागणार का? यामुळे देशाच्या विविध मोठ्या शहरातून मजूर मोठ्या संख्येने आपापल्या राज्यांमध्ये जाण्यास निघाले आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या या प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे का, हा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
प्रवास करताना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असायला हवा का? या प्रश्नाचे उत्तर भारतीय रेल्वेने ‘नाही’, असे दिले आहे. तसेच प्रवाशांकडे प्रवासाकरिता कोविड-19 निगेटिव्ह सर्टिफिकेट असण्याची गरज नाही. मात्र काही राज्यांमध्ये प्रवेश करण्याकरिता कोविड निगेटिव्ह रिपोर्टची गरज लागते. रेल्वेने प्रवास करताना किंवा चढण्यापूर्वी कोरोनाचा चाचणी अहवाल दाखवावा लागत नाही, अशी माहिती हिंदुस्थानच्या रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे सेवा बंद करणे किंवा रेल्वेगाड्यांची संख्या कमी करण्यासाठी सध्या कोणतीही योजना नाही. ज्यांना ट्रेनने प्रवास करणे गरजेचे आहे ते करू शकतात. त्यांना प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही. स्थलांतरित मजुरांच्या स्थलांतरणामुळे ट्रेनमध्ये गर्दी झाल्यास आम्ही त्वरित गाड्यांची संख्या वाढवू. उन्हाळ्यातील गर्दी पाहता आम्ही आधीच काही गाड्या सुरू केल्या आहेत. याकरिता लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनित शर्मा यांनी सांगितले आहे.
शर्मा यांनी पुढे अशी माहिती दिली आहे की, ज्या ठिकाणी ट्रेनमध्ये प्रवासाची प्रतीक्षा यादी 120 टक्के असेल, त्या ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जातील. गेल्या 10 दिवसातही आम्ही मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या 94 गाड्या चालवल्या आहेत, देशभरात 196 पॅंसेजर प्रवासी गाड्याही सुरू केल्या आहेत. तसेच गोरखपूर, पाटणा, दरभंगा, वाराणसी, गुहाटी, बरौनी, प्रयागराज, बोकारो, लखनऊ आणि रांचीसाठी अधिक गाड्यांची मागणी आहे.

























































