
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आपल्या ठुमक्यांनी तमाम प्रेक्षकांना घायाळ करणारी सपना चौधरी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. एकिकडे तिने याला नकार दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने काही फोटो व्हायरल करून तिने अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यामध्ये सपनाचा आणखी एक फोटो व्हायरल होत असून त्या फोटोमुळे ती काँग्रेस नव्हे तर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

न्यूज18 या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हायरल झालेल्या फोटोत भाजप दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी सपनाची भेट घेतल्याचं दिसत आहे. या वृत्तात मनोज तिवारी यांनीही सपनाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. सपनाने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या अफवेवरही नाराजी व्यक्त केल्याचं तिवारी यांनी सांगितलं. सपनाने आपल्याला जेव्हा कुठे प्रवेश घ्यायचा असेल तेव्हा मी समोरून सांगेन, असंही म्हटल्याचं तिवारी यांचं म्हणणं आहे. पुढे जे होईल, ते आम्ही तुम्हाला सांगूच, भाजप नेहमीच चांगल्या बातमीसाठी काम करतो, असंही तिवारी म्हणाले आहेत. त्यामुळे सपना कदाचित भाजपमध्येही प्रवेश करू शकते, असा कयास लावला जात आहे.























































