नवजात मुलीच्या पोटात आढळलं 10 आठवड्यांचं भ्रूण, वैद्यकीय तज्ज्ञ पडले अचंब्यात

एका नवजात मुलीच्या पोटात 10 आठवड्यांचं भ्रूण आढळल्याची अतिदुर्मिळ घटना घडली आहे. काही लोक याला चमत्कार मानत आहेत, तर काही लोक याला जैविक विकृती म्हणत आहेत.

इस्रायल येथील अशदोदमध्ये ही घटना घडली आहे. द सन या वृत्तपत्रामध्ये याबाबत वृत्त प्रसारित करण्यात आलं आहे. अशदोद येथील अस्सुता मेडिकल सेंटरमध्ये या मुलीचा जन्म झाला. या बाळाचं पोट थोडं मोठं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी तिची अल्ट्रसाउंड तपासणी केली.

त्यात एक विचित्र गोष्ट आढळली. नवजात बाळाच्या पोटात एक भ्रूण विकसित झालेला त्यांना आढळला. हा भ्रूण जवळपास 10 आठवड्यांचा होता. 10 आठवड्यात या भ्रूणाचा मेंदू, हृदय, हात आणि पाय विकसित झाले होते.

अर्थात हे भ्रूण पूर्णतः विकसित नव्हतं. त्यानंतर या नवजात मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि भ्रूण काढून टाकण्यात आलं. आता मुलीच्या जिवालाही काहीही धोका नसल्याचं स्पष्टीकरण वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलं आहे.

मात्र, या मुलीच्या पोटात अजून एक भ्रूण असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. तिची वेळोवेळी तपासणी केल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

वास्तविक, पाच लाख बाळांमध्ये एखाद्या बाळाच्या बाबतीत असा प्रकार घडू शकतो. मात्र, इस्रायलमध्ये यापूर्वी अशी सात बाळं जन्माला आल्याची माहिती मिळत आहे. यातील एक मुलगी आता 15 वर्षांची असून ती संपूर्णतः तंदुरुस्त आयुष्य जगत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या