Israel Palestine War – ‘गोळीबार, बॉम्बहल्ले अन् आकाशातून रॉकेट्सचा पाऊस’, हिंदुस्थानी दांपत्याने सांगितला भयानक अनुभव

हमास या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलाने संपूर्ण गाझापट्टीमध्ये तुफान हल्ले सुरू केले आहेत. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा करत हमासचे नामोनिशाण मिटवण्याचा पण घेतला आहे. दोन्ही बाजुने तुफान गोळीबार, बॉम्बहल्ले सुरू असून यात आतापर्यंत 3900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अचानक भडकलेल्या या युद्धामुळे अनेक हिंदुस्थानी नागरिकही इस्त्रालयमध्ये अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ची घोषणा करण्यात आली आहे.

इस्त्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धात हजारो हिंदुस्थानी नागरिक अडकले आहेत. यापैकीच एक मोहित रांधवा (Mohit Randhawa) आणि त्याची गर्भवती पत्नी जयदीप कौर (Jaideep Kaur) यांनी भयानक अनुभव माध्यमांना सांगितला आहे. 2020मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते आणि त्यानंतर ते इस्त्रायल येथे नोकरीच्या निमित्ताने गेले. हे दोघेही सध्या गाझा बॉर्डरपासून 74 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दक्षिण इस्त्रायलमधील एका बंकरमध्ये आसरा घेऊन रहात आहेत. त्यांनी 7 ऑक्टोबरला नक्की काय झाले हे सांगितले आहे.

जयदीप कौर हिने सांगितले की, ‘7 ऑक्टोबरला सकाळी साडे सहाच्या सुमारास आम्हाला कर्णकर्कश आवाजांमुळे जाग आली. बाहेर गोळीबार सुरू होता, आकाशातून रॉकेट्सचा वर्षाव सुरू होता. आम्हाला काही वेळातच राहती जागा सोडून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बनवण्यात आलेल्या बंकरमध्ये जाण्यास सांगण्यात आले.

थोडेफार स्नॅक्स आणि खुप कमी सामान घेऊन आम्ही पळ काढला. बाहेर बॉम्ब आणि रॉकेट्सचा वर्षाव होत होता, मात्र बंकर अभेद्य असल्याने आम्ही सुरक्षित राहिलो. बंकरमध्ये आम्ही एकूण 50 जण होतो. खरे तर 12 ऑक्टोबर रोजी विमानानं प्रसुतीसाठी मला उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील घरी निघायचं होते, परंतु या हल्ल्यांमुळे आमचे नियोजन बिघडले असून पुढे काय होते ते पाहूया, असे जयदीप कौर हिने सांगितले.

Israel Palestine War – हमासच्या हल्ल्यात 22 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू, बायडेन यांनी घेतला मोठा निर्णय

ती पुढे म्हणाले की, सुदैवाने बंकरमध्ये वायफाय होते. त्यामुळे आम्ही या भयानक हल्ल्याचे व्हिडीओ आणि बातम्या पाहू शकलो. या सर्व गोष्टींचा बाळावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून पतीने मोबाईल काढून घेतला, मात्र त्यानंतर मला फक्त वेबसीरिज पाहण्याची परवानगी दिली. लवकरच आम्हाला हिंदुस्थानात कुटुंबियांची भेट घेता येईल. आम्ही त्यांच्याशी फोन किंवा व्हॉटसअपवरून बोलू शकत नाही, सध्या फेसटाइम हा एकमेव पर्याय आहे.