
सामना ऑनलाईन । मुंबई
निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून पैसे वाटप तसेच वस्तू वाटप केले जाते. निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची अट घालून दिल्यानंतरही तिचे सर्रास उल्लंघन केले जाते. हे रोखण्यासाठी आता आयकर विभाग सरसावला आहे. आयकर विभागाकडून यासाठी 24 तास नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहेच पण आयकर विभागाचे अधिकारीही अशा गैरप्रकारांवर नजर ठेवून कारवाई करणार आहेत.
आयकर विभागाचे महानिदेशक के. के. व्यवहारे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. नगारिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांना असा कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
- तक्रारीसाठी निःशुल्क दूरध्वनी क्रमांक 1800221510, दूरध्वनी 022-22820562
- मोबाईल 9372727823/ 9372727823
400 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा वॉच
आयकर विभागाकडून 200 अधिकारी तसेच 200हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील सहा मतदारसंघांत हे अधिकारी गैरव्यवहारांच्या प्रकरणांवर नजर ठेवणार आहेत. सहा मतदारसंघांसाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. तक्रार आल्यानंतर तासाभरात हे पथक घटनास्थळी रवाना होणार आहे. विशेष म्हणजे जरी फसवा कॉल आला तरीही कारवाई करण्यात येणार आहे.
























































