भाजप सरकार निवडुन येण्यासाठी मदत केल्याची शरम वाटते – राजू शेट्टी

33

सामना प्रतिनिधी । राहुरी

हिंदुस्थानमध्ये साखरेचे साठे वाढल्याने निर्यात करण्याची गरज असताना केंद्रातील दळभद्री भाजप सरकारने पाकिस्तानमधुन साखर आयात केली तर दुध भुकटीसाठी निर्यातीचे धोरण घेण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले. साखर व दुधाचे संकट हे केंद्र सरकार निर्मित असल्याने भाजप सरकारला देशात व राज्यात निवडुन येण्यास मदत केली याची मला शरम वाटत असल्याची स्पष्ट कबुली खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

दुध, साखर, ऊसाच्या भावातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा म्हणुन चर्चेसाठी गेलो असता सेंद्रिय शेती करा हा सल्ला दिला जात आहे. तर दुधाच्या भावाची चर्चा केली असता जर्सी गायींची विक्री करा व देशी गाईंची खरेदी करा, असे सांगितले जात असल्याने देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह यांना शेतीतील ज्त्रान किती? हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

हिंदुस्थानात टोमॅटोला दीड रूपया किलो बाजारभाव असताना पाकिस्तान मध्ये टोमॅटोचा भाव ३०० रूपये किलो होता.मात्र सर्जिकल स्ट्राईक झाल्याने महागाचा टोमॅटो खाल्ला मात्र आपला टोमॅटो पाकिस्तान मध्ये येवु दिला नाही.या उलट आपल्याकडे साखर साठे वाढल्याने निर्यात करण्याची गरज असताना केंद्रातील दळभद्री भाजप सरकारने पाकिस्तान मधुन साखर आयात केल्याने शेतीमाल व दुधाचे संकट भाजपा सरकार निर्मित असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

मागील वर्षी शेतकऱ्यांनी ४२ कोटी रूपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले होते. यावर्षी शेती कर्जाचा आकडा २२ कोटी रूपयांवर आला आहे.हे कर्ज शेतकऱ्यांनी नव्हे तर बँकांनी नाकारले आसुन एकीकडे कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली नसतानाच दुसरीकडे या कर्जाच्या व्याजाचे तगादे बॅकाकडुन सुरू झाल्याचे शेट्टी म्हणाले.

भाजपा सरकारने अर्थव्यवस्था मोडण्याचे काम केले असल्याने भरपाई देण्याची देखील तयारी सुरू करावी अन्यथा भाजपा मंत्र्यांना देशात व राज्यात फिरकु दिले जाणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

साखर निर्यात धोरणात उदासीनता दाखविणाऱ्या केंद्र सरकारला उत्तरप्रदेश निवडणुकीतील पराभवाची चपराक बसल्यानेच देशातील साखर ३ हजार रूपये क्विंटलवर स्थिर झाली आहे. महाराष्ट्रात दैनंदिन १ कोटी लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. भाजप सरकारने दुध भुकटी निर्यात धोरण न राबविल्याने दुधाचे भाव मातीमोल झाले आहेत. राज्य सरकारने गुजरात व कर्नाटक सरकारच्या धोरणाप्रमाणे  प्रतिलिटर ५ रूपया प्रमाणे महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतक-याच्या खात्यावर वर्ग करावे अन्यथा भाजपाच्या मंत्र्यांना दिसेल तेथे दुधाने आंघोळ घालण्याचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांची भाषणे झाली.

आपली प्रतिक्रिया द्या