विमानात प्रवाशाची तब्येत बिघडली, दिल्ली-मुंबई फ्लाईटचे जयपूरमध्ये तातडीने लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात उड्डाणादरम्यान एका प्रवाशाची प्रकृती अचानक खालावल्याने विमानाचे जयपूर विमानतळावर तातडीने लँडिंग करण्यात आले. ही घटना दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानात घडली डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आणि योग्य वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे प्रवाशाचे प्राण वाचले असून, त्याला पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान (फ्लाईट क्रमांक 6E-322) दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले होते. विमान हवेत असतानाच एका प्रवाशाला गंभीर आरोग्य समस्येचा सामना करावा लागला. प्रवाशाची बिघडती प्रकृती पाहून केबिन क्रूने तातडीने याची माहिती वैमानिकाला दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला आणि ‘मेडिकल इमर्जन्सी’ घोषित करत जयपूर विमानतळावर उतरण्याची परवानगी मागितली.

एटीसीकडून परवानगी मिळताच विमानाचा मार्ग जयपूरकडे वळवण्यात आला. रात्री सुमारे साडेबारा वाजता विमानाचे जयपूर विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले. लँडिंगपूर्वीच विमानतळ प्रशासनाने वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिकेला धावपट्टीवर सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. विमानाचे लँडिंग होताच संबंधित प्रवाशाला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले.

या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे विमानावरील इतर प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी संयम राखत प्रवाशांना परिस्थिती समजावून सांगितली. आवश्यक सुरक्षा तपासणी आणि औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, रात्री दीड वाजता विमानाने मुंबईसाठी पुन्हा उड्डाण केले. या संपूर्ण प्रक्रियेत प्रवाशांना सुमारे एक तास जयपूर विमानतळावर प्रतीक्षा करावी लागली.