जळगाव घरकुल घोटाळा प्रकरण: माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना हायकोर्टाकडून जामीन

जळगाव येथील बहुचर्चित घरकुल योजना घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना बुधवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने जैन यांना जामीन मंजूर केला आहे. वाढते वय व प्रकृतीच्या मुद्दय़ावर त्यांनी जामिनासाठी केलेली विनंती न्यायालयाने मान्य केली आहे.

1990 मध्ये जळगावात घरकुल योजनेत झालेल्या 29 कोटींच्या घोटाळय़ाप्रकरणी सुरेशदादा जैन तसेच राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह 49 जणांना धुळय़ातील सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. याप्रकरणी सर्व आरोपींना सात वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या निकालानंतर सर्व आरोपींची नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. नंतरच्या काळात काही आरोपींना जामीन मंजूर झाला होता, मात्र सुरेशदादा जैन यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे जैन यांनी आपल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देत नियमित जामिनासाठी अर्ज केला होता.