
आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील अनेक भागांत इंधनाचा तुटवडा पडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र इंधनाचा तुटवडा पाहता जालना जिल्हाधिकाऱ्यांनी कॅन, बाटली आणि प्लॅस्टिक कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घातली असून शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी 5 टक्के इंधन साठा राखीव ठेवण्याचे आदेश सर्व पेट्रोल पंपांना दिले आहेत.
जालना जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती नागरिकांची डिझेल खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काहीजण कॅन आणि बाटलीच्या मदतीने इंधनाचा साठा करत आहेत. या इंधन तुटवडय़ाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्र यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पेट्रोल पंपांना सुटे पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घातली आहे. या आणीबाणीच्या काळात शासकीय कामकाजात कोणताही अडथळा येऊ नये किंवा पेट्रोल-डिझेल अभावी अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी 5 टक्के इंधन साठा राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केले आहेत.
हिंगोलीत डिझेलचा ठणठणाट
हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग चार दिवसांपासून डिझेलचा तुटवडा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा ठणठणाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकरी आणि वाहन चालकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले होते.
बीडमध्ये वाहनांच्या रांगा
बीडमध्ये पेट्रोल पंपावर सकाळपासूनच डिझेल आणि पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. खरीप हंगामासाठी ट्रक्टरच्या सहाय्याने शेतीकाम सुरू असल्याने शेतकरी कॅनमधून डिझेल भरून नेत आहेत. मात्र पेट्रोल पंपावर इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात येत असले तरी नागरिकांकडून मात्र याबाबत रोष व्यक्त केला जात आहे.

























































