
अतिवृष्टीमुळे खरीपाचे प्रचंड नुकसान झाल्यानंतरही जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे व थंडीचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीनंतर ढगाळ वातावरणाचा फटका या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीपाचे म्हणावे तसे उत्पादन मिळालेले नाही. त्यातच मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाळी वातावरण असून आता रब्बीच्या पिकांवरही ढगाळ वातावरणामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असल्याने गहू व हरभराचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
रब्बी हंगामात पाणी उपलब्ध असल्यामुळे कांदा, हरभरा या पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. त्यातच शेतकऱ्यांनी डोंगळा कांदा (बियाणे) लागवड करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच गहू, ज्वारी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे. परंतू सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
गहू व कांद्याचे क्षेत्र मोठे आहे. सुरुवातीपासूनच रोगाचा प्रादूर्भाव निर्माण झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. सततच्या ढगाळ वातावरण आणि गायब झालेली थंडी यामुळे गव्हावर मावा आला आहे मात्र, कधी न येणारी अळीही यंदा गव्हावर दिसू लागली आहे. तसेच परिसरातील उन्हाळी कांद्याचे रोप परतीच्या पावसाने गेले. मात्र, आहे त्या रोपामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अजूनही शेतकरी कांदा लागवड करत आहेत. या हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यावरही करप्याने आक्रमण केल्याने कांदा पिकही धोक्यात आले आहे. तर ऐन कणसात आलेल्या ज्वारीवरही चिकटा पडत असल्यामुळे कणसात दाणे कमी भरणार आहेत.
या बाबत बदनापूर तालुक्यातील राजेंद्र जऱ्हाड या शेतकऱ्याने सांगितले की, खरीपांचे प्रचंड नुकसानीनंतर उधारपाधारी करून रब्बीची लागवड केलेली होती. चांगले पिकेही आलेले होते. मात्र, मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे भरत आलेल्या हरभरा घाटयावर अळयांचे तर गहू पिकांवरही मावा तर ज्वारीवर चिकटा पडत असल्यामुळे उत्पादनाची घट होण्याची शक्यता आहे.



























































