
सामना प्रतिनिधी । बीड
राष्ट्रवादीने दुर्लक्षित केलेले जयदत्त क्षीरसागर यांनी अखेर आज अखेर वज्रमुठ आवळत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात लढा देण्याचा ठाम निर्धार केला. सध्या कोणत्याही पक्षात प्रवेश न करता लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या बाजूने लढण्याचा निर्णय त्यांनी केला आहे. स्वतः जयदत्त क्षीरसागर यांच्यासहित त्यांची संपूर्ण कुमक आता भाजपाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विजयासाठी रणांगणात उतरणार आहे. क्षीरसागर यांच्या या निर्णयाचा भाजपला फायदा व राष्ट्रवादीला फटका बसणार असे दिसतेय.
राष्ट्रवादीचे एक बडे नेते म्हणून ओळख असणारे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीने दुर्लक्षित केले होते. ऐन निवडणुकीच्या काळात बीड मध्ये अटीतटीचा सामना रंगला असताना गप्प बसलेले जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यासाठी क्षीरसागरांनी समर्थकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत संतप्त समर्थकांनी राष्ट्रवादीला धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला अखेर जयदत्त क्षीरसागरांनी आपण आणि आपली कुमक भाजपाच्या बाजूने उभी करण्याचा फैसला केला आहे. तीन तासांच्या या बैठकीत राष्ट्रवादीवर तोफ डागण्यात आली. क्षीरसागरांनी भाजपाच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला याचा फायदा प्रीतम मुंडे यांना किती होणार आहे हे आगामी काळात स्पष्ट होईल मात्र क्षीरसागराच्या या भूमिकेमुळे भाजपात उत्साह संचारला आहे हे नक्की.
मुंडे – क्षीरसागर ,नवा राजकीय अध्याय !
बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर आणि मुंडे हे राजकीय घराणे आतापर्यंत किंग ठरत आले आहे. वेगवेगळ्या पक्षात असले तरी नेहमीच क्षीरसागर आणी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी वैयक्तिक स्नेह कायम राहिला होता. राजकारणाच्या सारिपाटावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नेहमीच या दोन घराण्यांनी एकमेकांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला होता. गरज भासल्याच एकमेकांना पडद्याआड आधार देण्याचे काम ही केले जात होते असे बोलले जाते. मात्र चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच उघडपणे मुंडे घराण्याला बळ देण्याचे काम क्षीरसागरांनी केले आहे. बीडच्या राजकारणात या राजकीय मैत्रीचा नवा अध्याय सुरू होत आहे.




























































