
सामना प्रतिनिधी, बीड
लोकसभा निवडणुकीमध्ये आपले माप कोणाच्या पदरात टाकायचे यासाठी गप्प बसलेल्या क्षीरसागरांनी अखेर आपल्या समर्थकांची व्यापक बैठक बोलावली आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता क्षीरसागरांचा फैसला ठरणार आहे. बजरंग सोनवणे की प्रीतम मुंडे कोणासाठी यंत्रणा कामाला लावायची यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकीचे रणमैदान तापले असताना बीडमधील माजी मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर हे गेल्या महिनाभरापासून राजकीय पटलावरून गायब आहेत. या निवडणुकीमध्ये या दोन्ही बंधुंची भूमिका काय राहणार याकडे त्यांच्या समर्थकांचे आणि जिल्हावासियांचे लक्ष लागले होते. जयदत्त क्षीरसागर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही गेले नाहीत आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या मिटिंगलाही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ते परत राष्ट्रवादीचे काम करतील ही शक्यता नाममात्रच आहे.
गेल्या वर्षभरापासून क्षीरसागर भाजपाच्या व्यासपीठावर दिसत आहेत. यावरून त्यांची भूमिका काय असणार हे वेगळं सांगण्याची गरज नसली तरी क्षीरसागर बंधुंनी आपल्या समर्थकांच्या आग्रहाखातर जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची व्यापक बैठक बीडमधील आशिर्वाद लॉन्स येथे शुक्रवारी 5 एप्रिल रोजी बोलावली आहे. या बैठकीमध्येच क्षीरसागरांच्या राजकीय भूमिकेवर शिक्कामोर्तब होणार आहे. या बैठकीमध्येच कोणाचे पदरात माप टाकायचे हे ही ठरले जाणार असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपसह जिल्ह्याचे लक्ष क्षीरसागरांनी आयोजित केलेल्या मेळाव्याकडे लागले आहे.

























































