
सामना ऑनलाईन, मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक चणचणीत सापडलेल्या जेट एअरवेजमध्ये अनुभवी पायलट्सचा तुटवडा जाणवत आहे. पायलट नसल्याने जेटच्या देशांतर्गत सेवेला फटका बसला असून शेकडो प्रवाशांची रखडपट्टी झाली आहे. रविवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनसवरून टेक ऑफ करणारी जेटची दहा उड्डाणे रद्द झाली आहेत.
जेट एअरवेजने रविवार, 18 नोव्हेंबरला काही देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. फ्लाईट्स रद्द केल्याची माहिती जेटने एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना दिली. फ्लाईट्स रद्द झाल्यामुळे प्रवाशांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल जेटने दिलगिरीही व्यक्त केली आहे.
पायलटच्या पगारासाठी जेटकडे पैसे नाहीत
एअरलाईन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेटकडे पायलटना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. हीच समस्या इंजिनीयर्स आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांबाबतीतही आहे. पगाराची शाश्वती नसल्याने अनेक अनुभवी पायलटस्नी जेटला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे सध्या जेटला पायलट्सची कमतरता भासत असून डय़ुटीवर असलेल्या पायलट्सना ओव्हरटाइम करावा लागत आहे. आर्थिक चणचणीमुळे सध्या जेट नवीन पायलट्सची नेमणूकदेखील करू शकत नाही. याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत असून ही स्थिती कायम राहिल्यास जेटच्या प्रवाशांमध्ये घट होण्याची भीती आहे.

























































