मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

झारखंड उच्च न्यायालयाने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दिलासा दिला आहे. 2018 साली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी न्यायालयाने 27 फेब्रुवारी 2024 रोजी राहुल गांधी यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. याप्रकरणी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या याचिकेवर चाईबासा दिवाणी न्यायालयात 27 फेब्रुवारी 2024 रोजी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधी यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. राहुल गांधी यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज (20 मार्च 2024) रोजी सुनावणी पार पडली. झारखंड उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने 27 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटला एका महिन्यासाठी स्थगिती दिली आहे.

18 मार्च 2018 रोजी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात भाषण करताना अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यामुळे नवीन झा नावाच्या भाजप कार्यकर्त्याने रांची कोर्टात याचिका दाखल केली होती.