
कर्णधार स्मृती मंधानाची धडाकेबाज अर्धशतकी खेळी व कुशल नेतृत्व आणि दीप्ती शर्मा, सलमा खातूनच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर ट्रेलब्लेझर्स संघाने सोमवारी झालेल्या महिला टी-20 चॅलेंज या महिलांच्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीत सुपरनोवास संघाला 16 धावांनी पराभूत करीत चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. या पराभवासोबत सुपरनोवासचे सलग तिसऱयांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. 68 धावांची खेळी साकारणारी स्मृती मंधाना हिची ‘प्लेअर ऑफ दी मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. राधा यादव ‘प्लेअर ऑफ सीरिज’ची मानकरी ठरली.
ट्रेलब्लेझर्सकडून मिळालेल्या 119 धावांचा पाठलाग करणाऱया सुपरनोवास संघाला 20 षटकांमध्ये 7 बाद 102 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार हरमनप्रीत काैरने सर्वाधिक 30 धावा केल्या. सलमा खातूनने 18 धावा देत तीन फलंदाज बाद केले. दीप्ती शर्माने 9 धावा देत दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान, याआधी स्मृती मंधानाने 49 चेंडूंत तीन षटकार व पाच चौकारांसह 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, पण इतर फलंदाजांच्या अपयशामुळे ट्रेलब्लेझर्स संघाला 118 धावांपर्यंतच मजल मारता आली. राधा यादवने 16 धावांमध्ये ट्रेलब्लेझर्सचा निम्मा संघ गारद केला.
कर्णधाराचा विजयी मंत्र कामी आला
कर्णधार स्मृती मंधाना हिने विजयानंतर आपली भावना व्यक्त करताना म्हटले की, प्रथम फलंदाजी करताना आम्ही 118 धावा केल्या होत्या. त्यानंतर मी खेळाडूंना सांगितले, 20 षटके अप्रतिम गोलंदाजी करा. असे केल्यास आपण नक्कीच विजय होऊ. स्मृती मंधानाचा हा विजयी मंत्र कामी आला. ट्रेलब्लेझर्स संघातील गोलंदाजांनी खेळपट्टीची नस ओळखून अचूक टप्प्यात गोलंदाजी केली आणि विजयाला गवसणी घातली.

























































