घ्या… जिंकल्यास आम्हीही मोफत लस टोचू; अमेरिकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘भुलभुलैया’

मतदारांची दिशाभूल करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत भाजपच्या ‘भुलभुलैया’ खेळीचा वापर करण्यात आला आहे. ‘निवडून द्या, मोफत लस टोचू’ या बिहारमधील भाजपच्या आश्वासनाचा कित्ता डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी गिरवला आहे. अमेरिकन जनतेने मला निवडून दिल्यास सर्वांना मोफत लस टोचली जाईल, असे आश्वासन त्यांनी प्रचारसभेत दिले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अपयशाचा पाढा वाचला.

अमेरिकेत येत्या 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. मोजकेच दिवस हाती उरल्याने दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. शुक्रवारी अंतिम ‘प्रेसिडेंशिअल डिबेट’ पार पडल्यानंतर बिडेन यांनी डेलावेयरच्या विलमिंग्टन येथील प्रचारसभेत ट्रम्प यांच्यावर आरोपांची तोफ डागली. यावेळी आश्वासनांची खैरात करताना त्यांनी हिंदुस्थानातील भाजपच्या ‘भुलभुलैया’ नितीचा अवलंब केला. ट्रम्प भले सांगत असतील, सरकारने कोरोना महामारीचा मुकाबला केला. पण ते सपशेल अपयशी ठरले आहेत. आम्ही मात्र कुठलीही हयगय करणार नाही. तुम्ही मला निवडून दिल्यास अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला मोफत लस टोचण्याची व्यवस्था मी करतो. मग कुणी विमा काढलेला असो वा नसो. जिंकल्यास मोफत लस देणारच, असे आश्वासन बिडेन यांनी दिले.

ट्रम्प खोटे बोलतात – बिडेन
अमेरिकेत कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही बाब ट्रम्प नाकारू शकत नाही. त्यांना अजूनही कोरोना म्हणजे थट्टाच वाटतेय. कित्येक महिन्यांपासून ते कोरोना विषाणू नष्ट करू, अशा थापा मारताहेत. ते नेहमीच खोटे बोलतात. त्यांच्या अपयशामुळेच अमेरिकेची जनता कोरोनासोबत जगायला शिकेल का, हे ठाऊक नाही, परंतु मरायला नक्कीच शिकेल, असा आरोप बिडेन यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या