अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आजही प्रश्न उपस्थित होतायत – अमिताभ बच्चन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amitabh-bachchan

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नुकतीच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली आहेत. मात्र, आजही नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, असे बिग बी यावेळी म्हणाले.

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बिग बी यांनी पत्नी जया बच्चन यांच्याबरोबर हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह शाहरुख खान, राणी मुखर्जी, अर्जित सिंग आदी उपस्थित होते. दरम्यान, बिग बी यांच्या या वक्तव्यानंतर ’असे बोलायला हिंमत लागते’, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी बिग बी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. दुसरीकडे बिग बी यांच्या या वक्तव्यावर भाजप आक्रमक झाली आहे. अमिताभ यांनी अशा ठिकाणी स्वातंत्र्याबद्दल बोलले आहेत. जिथे निवडणुकीनंतर सर्वाधिक रक्तरंजित हिंसाचार झाला, असे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे.

प्रेक्षकांना गृहित धरणे चुकीचे

आपण प्रेक्षकांना गृहित धरणे चुकीचे असते. आज प्रेक्षकांकडे विविध विषय सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना काय पाहायचे, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायचे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. त्याची निवड ते करु शकतात, असेही बिग बी यावेळी म्हणाले.