
प्रेयसी रुसल्याचं सांगून पत्रिका दाखवायला गेलेल्या दोघांनी ज्योतिषाच्या घरीच डल्ला मारल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. ज्योतिषाला बेशुद्ध करून त्याचं घर लुटून या चोरांनी पोबारा केला आहे. या चोरांचा सध्या शोध सुरू आहे.
या ज्योतिषाचं नाव तरुण शर्मा असं आहे. शर्मा हे कानपूरच्या गोविंद नगर परिसरात राहतात. ते घरूनच ज्योतिषविषयी मार्गदर्शन आणि इतर पूजा सांगण्याचं काम करतात. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, 2 ऑक्टोबर रोजी रात्री दोन तरुण त्यांची पत्रिका दाखवण्यासाठी आले होते. त्यांच्या प्रेयसी त्यांच्यावर रुसल्या होत्या. त्यांना मनवण्यासाठी उपाय विचारायला ते आले होते.
रात्रीच्या वेळी ते आल्याने शर्मा यांनी आपल्याच घरी जेवण्याचा आणि काही काळ आराम करण्याची विनंती केली. जेवण करत असताना या तरुणांनी शर्मा यांच्या जेवणात गुंगी आणणारं औषध मिसळलं. त्यामुळे शर्मा यांना झोप लागली. त्यानंतर चोरांनी शर्मा यांचा फोन, कपाटातील रोख रक्कम, सोन्याची अंगठी घेऊन पोबारा केला. झोपेतून जागे झाल्यानंतर शर्मा यांना आपल्या घरी चोरी झाल्याचं समजलं. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये या अज्ञातांविरोधात तक्रार केली असून त्यांचा शोध सुरू आहे.























































