सहलीदरम्यान विद्यार्थ्यासोबत मुख्याध्यापिकेचे चुंबन फोटोशूट, पालक हादरले

शाळेच्या सहलीसाठी गेलेल्या मुख्याध्यापिकेने प्रियकर अथवा नवऱ्यासोबत करतात तसे विद्यार्थ्यासोबत रोमँटीक फोटोशूट करून घेतले. मुख्याध्यापिका आणि अल्पवयीन मुलगा एकमेकांची चुंबने घेतानाचे फोटो काढण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामुळे पालक हादरले आहे. हा प्रकार कर्नाटकमध्ये घडला आहे. चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेची सहल गेली होती. या सहलीदरम्यान हे फोटोशूट करण्यात आले आहे. हे फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर मुख्याध्यापिकेविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. शाळेच्या सहलीत विद्यार्थ्याचं चुंबन घेतल्याचा आणि त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचा या मुख्याध्यापिकेवर आरोप करण्यात आला आहे. या दोघांचे फोटोशूट सहलीला गेलेल्या दुसऱ्या एका विद्यार्थ्याने चित्रित केले होते. जे व्हायरल झाले आहे.

हे फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी तातडीने शाळा गाठली आणि मुख्याध्यापिकेविरोधात तक्रारी केल्या. सदर प्रकरणाची दखल घेत चिक्कबल्लापूरचे शिक्षण उपसंचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. सदर प्रकरणाच्या त्यांनी चौकशीचे आदेश दिले. बराच गदारोळ झाल्यानंतर मुख्याध्यापिकेने वादाच्या केंद्रस्थानी असलेले फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले. हे फोटो पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून मुख्याध्यापिकेविरोधातील चौकशीचा अहवाल गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सादर केला आहे.

या शाळेची सहल 22 ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजित केली होती. होरानाडू, याना या ठिकाणांना सहलीदरम्यान भेट देण्यात आली होती. सहलीदरम्यानच मुख्याध्यापिकेने हे फोटोशूट करवून घेतले. फोटो दिसणारा विद्यार्थी, फोटो काढणारा विद्यार्थी आणि मुख्याध्यापिका वगळता या फोटोशूटची अन्य कोणालाही कल्पना नव्हती.