
कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) दिल्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली. दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटल्याची पुष्टी झाल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA)ने ३ मे रोजी झालेली NEET-UG परीक्षा रद्द केली असून २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने बारावीच्या (PUC) परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते आणि NEET परीक्षाही तिची चांगली झाली होती. कुटुंबात कोणतीही अडचण किंवा तणाव नव्हता. “आमचे कुटुंब आनंदाने राहत होते. ती परीक्षेत चांगली कामगिरी करून आली होती. मात्र पुन्हा NEET परीक्षा द्यावी लागणार या विचारामुळे तिच्या मनात काही भावना किंवा तणाव निर्माण झाला असावा,” असे त्यांनी सांगितले.
मुलीच्या मृत्यूनंतर भावूक झालेल्या वडिलांनी कोणालाही दोष देण्यास नकार दिला. “तिने चांगली कामगिरी केली होती, सर्व काही व्यवस्थित सुरू होते. कदाचित पुन्हा परीक्षा द्यावी लागणार याबाबत तिच्या मनात काहीतरी सुरू असावे. मी कोणावरही आरोप करत नाही. तिच्या मनातील वेदना आणि संघर्ष आम्हाला समजू शकले नाहीत,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
NEET-UG 2026 परीक्षा ३ मे रोजी पार पडली होती. मात्र प्रश्नपत्रिका फुटणे/गळती झाल्याची पुष्टी झाल्यानंतर ती रद्द करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. परीक्षा शुल्काची पूर्ण परतफेड तसेच परीक्षेतील औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १५ मिनिटांचा वेळ देण्याची घोषणाही करण्यात आली. तरीही अनेक विद्यार्थ्यांमध्ये फेरपरीक्षेबाबत चिंता कायम आहे.
अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या प्रयत्नात चांगली कामगिरी झाल्याचा विश्वास होता. त्यामुळे पुन्हा परीक्षा देताना त्याच पातळीची कामगिरी करता येईल का, याबाबत त्यांच्यात संभ्रम आणि तणाव असल्याचे सांगितले जात आहे. अचानक परीक्षा रद्द झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसल्याचेही समोर आले आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, कलबुर्गीतील विद्यार्थिनीने कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. या प्रकरणी स्टेशन बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

























































