
सामना ऑनलाईन। तिरुवनंतपुरम
कोची येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याला ‘निपाह’चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर केरळ सरकार अधिक सतर्क झाले आहे. गेल्या वर्षी ‘निपाह’ने 17 जणांचा बळी घेतला होता. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आम्ही केंद्र सरकारशी सतत संपर्कात असल्याचे मंगळवारी केरळ सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
ताप आल्यामुळे उपचारासाठी दाखल केलेल्या 23 वर्षीय तरुणाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी’ या संस्थेकडे पाठवले होते. त्या नमुन्यांच्या अहवालातून ‘निपाह’ संसर्गाचे निष्पन्न झाल्याचे राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले. मुख्यमंत्री विजयन यांनी सरकारतर्फे पुरेशी खबरदारी घेतली जाईल, त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
आरोग्य खात्याच्या सूचना पाळा!
मुख्यमंत्री विजयन यांनी राज्यातील नागरिकांनाही सतर्कतेच्या दृष्टीने आरोग्य खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे. निपाहग्रस्त तरुणाच्या संपर्कात आलेल्या इतरांचाही शोध घेण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीवरही लक्ष ठेवले जात असल्याचे विजयन सांगितले.






















































