
महाराष्ट्र अंध क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने अंधांच्या 13व्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत खान्देश व पश्चिम महाराष्ट्र संघांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवत आगेकूच केली.
शिर्डीमधील कोकणठाण येथील आत्ममलिक क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत खान्देश विभागाने मुंबई विभागावर 10 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱया मुंबई विभागाच्या फलंदाजांचा खानदेशच्या सुशील ढेपळेच्या (3/25) गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही व संघ 14.5 षटकांत 131 धावांवर आटोपला. मुंबईकडून विशाल अंबलिया (34) व अरबाझ पटेलने (20) सर्वाधिक धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करणाऱया खान्देश विभागाच्या सलामीच्या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. उमेश जाधव (नाबाद 54) व राहुल महाले (नाबाद 67) यांनी पहिल्या विकेटसाठी अभेद्य शतकी भागीदारी रचताना खानदेशला 13.4 षटकांत बिनबाद 132 धावसंख्येपर्यंत पोहोचवत विजय मिळवून दिला.

























































