
हिंदुस्थानचा सलामी फलंदाज लोकेश राहुलला ओव्हल कसोटीतील दुसऱ्या डावात पंचांच्या निर्णयाला असहमती दाखवल्यामुळे दंड ठोठावण्यात आला. आयसीसीकडून लेव्हल वन नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोकेश राहुलच्या कसोटी मानधनातील 15 टक्के कापून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅण्डरसन हिंदुस्थानच्या दुसऱ्या डावातील 34वे षटक टाकत होता. या षटकादरम्यान लोकेश राहुलच्या बॅटला चेंडू स्पर्श करून यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोच्या हाती विसावला. तिसऱ्या पंचांकडून लोकेश राहुलला बाद घोषित करण्यात आले. लोकेश राहुलने पंचांच्या या निर्णयाला असहमती दाखवली. त्यामुळे त्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कापण्यात आली.
तसेच लोकेश राहुलच्या अनुशासन प्रगती पुस्तकात एक डिमेरेट गुणही जोडला गेला. 24 महिन्यांत त्याच्याकडून पहिल्यांदा उल्लंघन करण्यात आले आहे. लोकेश राहुलकडून चूक झाल्याचे कबूलही करण्यात आले आहे.

























































