कोल्हापूरात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून साडे चार कोटींचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत लॉकडाऊन निर्बंधांत विनामास्क, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनधारक, दुकानदार, व्यापारी, मार्निंग वॉक करणऱयांकडून तब्बल चार कोटी 88 लाख 70 हजार 590 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. साडेतीन महिन्यांत जिल्हा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

4 एप्रिल ते 18 जुलै या साडेतीन महिन्यांत पोलिसांनी विविध ठिकाणी ही कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वाधिक वाहनधारकांवर कारवाई करून तब्बल तीन कोटी 17 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये 20 हजार 738 वाहने जप्त करण्यात आली.

एक लाख 71 हजार 356 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्याखालोखाल विनामास्क आढळलेल्या 84 हजार 254 जणांकडून एक कोटी 46 लाख 38 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, तर अधिक वेळ दुकाने सुरू ठेवणाऱया तीन हजार 665 दुकानदारांकडून 31 लाख 89 हजार 90 रुपये दंड वसूल करण्यात आला. मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन हजार 536 जणांकडून 10 लाख 45 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय 323 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.