कोल्हापुरातील व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून 3 कोटी खंडणी उकळली, तिघा आरोपींना अटक, महिला फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मैत्री करून कोल्हापुरातील एका व्यावसायिकाला पद्धतशीर लुबाडणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट-10 च्या पथकाने बेडय़ा ठोकल्या आहेत. तरुणीचे शारीरिक शोषण केल्याचा बनाव रचत आरोपींनी व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत तीन कोटी 26 लाखांची खंडणी उकळली होती. अखेर व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर आरोपींचा खेळ खल्लास झाला.

कोल्हापुरातील साखरेचे व्यापारी असलेले विजयसिंह (नाव बदललेले) यांची अनिल चौधरी याच्याशी 2016 साली ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही वारंवार एकमेकांच्या संपर्कात येऊ लागले. 2019 मध्ये विजयसिंह हे अंधेरी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेले असताना आरोपीने त्याच्या मैत्रिणीशी ओळख करून दिली व एकत्र जेवण करण्याचा बहाणा केला. तेव्हा लुगना ऊर्फ सपना वजीर ही महिला तिच्या सहकारी महिलेसह विजयसिंह यांच्यासह रूममध्येच जेवण करायला आली. त्यावेळी अनिल हा रूममध्ये नव्हता. दरम्यान, काही वेळेनंतर काही कागदपत्र दाखवायचे असल्याचा बहाणा करीत लुगना रूमबाहेर गेली. थोडय़ा वेळाने तिने दरवाजा ठोठावला असता विजयसिंह दरवाजात गेले. तेव्हा लुगना हिने विजयसिंह यांना तेथेच बोलण्यात गुंतवले. त्याचदरम्यान रूममध्ये असलेल्या तरुणीने कपडे काढून ती बेडवर घाबरलेल्या अवस्थेत बसली. लुगना हिने रूममध्ये जाऊन लगेच तिची शूटिंग काढली. त्यानंतर  ती शूटिंग व्हायरल करू अशी धमकी देत अनिल, लुगना आणि मनीष सोदी हे तिघे विजयसिंह यांना ब्लॅकमेल करू लागले. त्यांनी त्या जोरावर तब्बल तीन कोटी 26 लाख उकळले. मात्र आरोपींचा त्रास असह्य झाल्याने विजयसिंह यांनी गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांकडे लेखी तक्रार दिली.

 युनिट-10 चे प्रभारी निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण लोंढे व पथकाने तत्काळ तपास सुरू केला. आरोपी हे विजयसिंह यांच्याकडे आणखी 17 लाखांची मागणी करत अंधेरीच्या कॅफे कॉफी डे येथे बोलावले. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अनिल, मनीष आणि लुगना या तिघांना पकडले. आणखी एक महिला आरोपी फरार असून तिचा शोध सुरू आहे.