कोल्हापुरात पंचगंगेसह नद्यांचे पाणी पात्रात, दुर्गंधी अन् साथीच्या आजारांत वाढ; खड्डय़ांमुळे रस्त्यांची झाली चाळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असताना पावसाचा जोर कमी झाल्याने संभाव्य पुराचा धोका यंदा टळला आहे. पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगेसह सर्व नद्यांचे पाणी पुन्हा पात्रात वाहत आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून, गेल्या 24 तासांत केवळ 2.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 19.2 मि.मी. पावसाची नोंद झाली.

दरम्यान, नद्या-नाल्यांचे पाणी ओसरल्यानंतर गाळ वाहून आलेल्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. वातावरणातील बदलामुळे साथींच्या आजारातही वाढ झाली आहे. शिवाय पावसामुळे शहरात आणि ग्रामीण भागात जिकडे-तिकडे सर्वच रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण झाल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या चोवीस तासांत पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी 5 फुटाने कमी झाली. काल सायंकाळी पाचच्या सुमारास 24.11 फूट असलेली पाणीपातळी आज सकाळी 21.9 फूट झाली होती. सायंकाळी चारच्या सुमारास ही पातळी 20.2 फुटांवर आली होती. दुपारपर्यंत आणखी दोन बंधाऱयावरील पाणी उतरले. त्यामुळे सायंकाळपर्यंत केवळ अकरा बंधारे पाण्याखाली गेले होते. जिह्यातील सर्व मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू होती.

धरणातील पाणीसाठा व विसर्ग

जिह्यात 4 मोठे, 12 मध्यम, तर 60 लघु आणि एक उपसा सिंचन योजना असे एकूण 77 धरण प्रकल्प आहेत. राधानगरीसह प्रमुख धरणे सध्या 75 ते 99 टक्के भरली आहेत. गेल्या वर्षी 1 जून ते 21 जुलै या काळात राधानगरी धरण क्षेत्रात 1683 मि.मी.. तर यंदा याच काळात 2 हजार 38 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा 15 ते 20 टक्के अधिक आहे.