समुद्र किनाऱ्यावर जाळ्यात अडकलेल्या कासवाला मिळाले जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समुद्रकिनाऱ्यावर सकाळी फिरायला गेलेल्या एका इसमाला जाळ्यात अडकलेले कासव दिसले. या व्यक्तीने सुटकेसाठी धडपडत असलेल्या कासवाची सुखरुप सुटका करुन त्याला समुद्रात सोडत जीवदान दिले.

मुणगे आडवळवाडी येथील ग्रामस्थांची घरे समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे तेथील ग्रामस्थ सकाळी समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी जातात. त्याप्रमाणे आज सकाळी पहाटे नेहमी प्रमाणे अजित रासम हे समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले असताना बऱ्याच दूर अंतरावर त्यांना जाळ्यात काहीतरी अडकले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अजित रासम यांनी त्या ठिकाणी जावून पाहिले तब्बल पाच किलो वजनाचे एक समुद्री कासव जाळ्यामध्ये अडकले होते. सदर कासव समुद्र किनाऱ्यावर रात्री वाळूमध्ये अंडी घालण्यासाठी आले असावे असा अदांज त्यांनी व्यक्त केला. ते कासव आपली सुटका करून घेण्यासाठी धडपडत होते. अजित रासम यांनी तात्काळ आपल्या घराकडून जाळी कापण्यासाठी हत्यार आणून जाळी कापून कासवाची सुटका केली. परंतु जाळ्यात रात्रभर अडकलेल्या कासवाला आधी नीट चालता येत नव्हते. मात्र नंतर कासवाला वाळूत सोडले असता ते चालू लागले. त्यानंतर कासवाला समुद्राच्या पाण्यात सोडून जीवदान दिले.