45 व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा; नवी मुंबईला विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरीतील पोलीस कवायत मैदानावर चार दिवस सुरू असलेल्या 45 व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत नवी मुंबईने निर्विवाद वर्चस्व गाजवले.पुरूष आणि महिला या दोन्ही गटात नवी मुंबईने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.चार दिवस सर्वच क्रीडा प्रकार चुरशीचे आणि रंगतदार सामने झाले. पारितोषिक वितरणाप्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, पोलीस खात्याचे काम हे धकधकीचे असून या व्यवस्थेमध्ये आपण काम करत असताना आपण तंदुरुस्त असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी खेळणे आवश्यक आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेशे घट्टे, तटरक्षक दलाचे कमांडट श्री. एस.आर.पाटील,जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दिक्षित,उद्योजक दिपक गद्रे,महावितरणचे पेटकर,पाटबंधारेचे दाभाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

45 व्या कोकण विभागीय परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पीयनशीप पुरुष व महिला या दोन्ही गटातील चषक नवी मुंबईच्या खेळाडूंनी पटकवला. बेस्ट ॲथलीट पुरुष गटातील पुरस्कार सिंधुदुर्गच्या राहूल काळे तर महिला गटामध्ये बेस्ट ॲथलीटचा पुरस्कार रत्नागिरीच्या धनश्री घाडी यांनी पटकावला. तसेच 100 मिटर धावणे पुरुष गटामध्ये सिंधुदूर्गाच्या राहूल काळे यांनी तर महिला गटामध्‍ये 100 मिटर धावणे मध्ये रत्नागिरीची मंजिरा रेवाळे यांनी पहिला येण्याचा मान मिळविला. मैदानी खेळामध्ये हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल पुरुष गटामध्ये रत्नागिरीने प्रथम पारितोषिक पटकावले. तर फुटबॉल, बास्केटबॉल पुरुष गटामध्ये रायगडने प्रथम पारितोषिक पट‍कवाले. पुरुष गटामध्ये खो खो चे प्रथम पारितोषिक नवी मुंबईने तर हॅण्डबॉलचे प्रथम पारितोषिक पालघरने पटकावले. यावेळी सर्व विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे म्हणाले खेळाडूंचे रत्नागिरी येथील खेळामधील प्रदर्शन उत्तम झाले आहे. असेच प्रदर्शन आपण राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत दाखवावे अशी आशा व्यक्त केली.