इ. स. पूर्व तीन हजार वर्षांपूर्वीची संस्कृतीजगासमोर, कोकणात सापडला 54 कातळशिल्पांचा जागतिक ठेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱया तब्बल 52 कातळशिल्पांचा कोकणातील ठेवा लवकरच जगासमोर येणार आहे. रत्नागिरी, राजापूर आणि लांजा येथे पर्यटनदृष्टय़ा कातळशिल्पांचा विकास सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गात आता कातळशिल्पांचा शोध सुरू झाला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने कातळशिल्पांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले व कोकणातील कातळशिल्पांना जागतिक वारसा स्थळे म्हणून ‘युनेस्को’ने तत्त्वतः मान्यता दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचा पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत कातळशिल्पांच्या जनजागृतीसाठी राज्यात 19 ते 25 नोव्हेंबर या काळात जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

या कातळशिल्पांमुळे कोकणाचा आर्थिक व सांस्कृतिक विकासही होण्यास मदत होणार आहे. कारण जागतिक वारसा वास्तूच्या शोधात अनेक पर्यटक वेगळ्या वाटा धुंडाळत असतात. कोकणातील या कातळशिल्पांना भेट देण्याच्या निमित्ताने पर्यटकांची पावले आता कोकणाकडे वळू लागली आहेत.

सतरा कातळशिल्पांचा विकास

राज्याच्या पुरातत्व विभागाने रत्नागिरी, राजपूर, लांजा येथील तब्बल 117 गावांमध्ये शोध घेतल्यानंतर 52 गावांमध्ये कातळशिल्पांचा शोध लागला. त्यापैकी 17 कातळशिल्पांचा विकास सुरु आहे. या कातळशिल्पांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता, कातळशिल्पांना कुंपण, माहिती फलक लावण्याच्या कामांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. इतर शिल्पांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल.  आता सिंधुदुर्गात कातळशिल्पांसाठी शोधमोहीम सुरू होईल, असे राज्याच्या पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे म्हणाले. ही कातळशिल्पे साधारणपणे इ. स. पूर्व तीन हजार वर्षांपूर्वीची ही इतिहासकालीन पूर्व कलेचा प्राचीन ठेवा आहे. राज्यातील अनेकांना अजूनही कातळशिल्पांबद्दल माहिती नाही. त्यांना ही माहिती देणे हा त्यामागील हेतू आहे.