
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोपरगाव गावठाण भागाची मुख्य जलवाहिनी खंदकनाल्यातून गेली असून जलवाहिनीतून गेल्या दोन अडीच महिन्यापासून गळती सुरू आहे. यामुळे शुध्द पाण्याच्या बदल्यात अशुध्द पाणी गावठाण भागातील हजारो नागरिकांना प्यावे लागत आहे. यामुळे या भागात डेंग्यू, स्वाईन फल्यु, मलेरिया, गोचीड ताप या आजारांनी मोठया प्रमाणात थैमान घातले असून सर्वत्र रोगराई पसरली आहे. नगराध्यक्ष व पालिका प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे कोपरगावकरांच्या आरोग्यासाठी कोपरगाव शिवसेना खंदकनाल्यात उतरून पदरमोड करून पाईप बदलून गावठाण भागाला शुध्द पाणी देणार असे आश्वासन माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी दिली.
कोपरगाव शहरातील गावठाण भागातील मेन रोड, सराफबाजार, सप्तर्षी मळा, काले मळा, बाजारतळ, कापड बाजार, गोदाम गल्ली, जुनी मामलेदार कचेरी, स्वा.सावरकर, व गांधी चौक, देवी मंदीर, गजानन नगर, गिरमे चाळ, कोर्ट रोड, आदीसह भागाला या मुख्य जलवाहिनीवरून पाणी पुरवठा किमान चार दिवसाआड केला जातो. लक्ष्मीनगर, श्रध्दानगरी, संजयनगर, गांधीनगर कत्तल खाना, सुभाषनगर, तेरा बंगले कर्मवीरनगर, भगवती कॉलनी, गोकुळनगरी, कोपरेनगर, कोपरगाव एसटीस्टॅन्ड, या शहराच्या पश्चिम व उत्तर भागातील सर्व मैला व दूषित पाणी खंदक नाल्यात येते. कित्येक दिवसांत हा नाला साफ केला नाही. मात्र या जलवाहिनीला गळती लागल्याने शुध्द पाणी नाल्यात जाते तर नाल्यातील हजारो लिटर अशुध्द पाणी जलवाहिनीत जाते. काळे व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे पाहिले दहा मिनिटे पाणी महिला पाणी भरत नाही. ते पाणी गटारात सोडून देतात. त्यांनतरही भरलेले पाण्याला दुर्गंधीचच असते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, झावरे यांनी दिलेल्या आश्वासनावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
































































