कुडाळात फ्लाय ओव्हर ब्रिजसाठी संघर्ष, जिल्हाधिकारी व ठेकेदार कंपनीशी करणार चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाअंतर्गत कुडाळ शहरात हॉटेल आरएसएन ते राज हॉटेल दरम्यान फ्लाय ओव्हर ब्रिज झालाच पाहिजे. प्रसंशी संघर्ष उभा करण्याचा निर्धार कुडाळ शहरवासियांच्या बैठकीत करण्यात आला. या मूलभूत मागणीसाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनीसुद्धा एकत्र यावे असे आवाहन यावेळी करत वेळप्रसंगी जिल्हाधिकारी व ठेकेदार कंपनीशी चर्चा करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. कुडाळ शहरातील प्रश्नाबाबत सोमवारी सायंकाळी कुडाळ मधील नागरिकांची बैठक कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष ओंकार तेली, कुडाळ बचाव समितीचे अध्यक्ष अॅड. राजीव बिले, स्मार्ट फोरम कुडाळचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, काका कुडाळकर, संजय पिंगुळकर, राजन बोभाटे, राजन नाईक, निलेश तेंडोलकर, योगेश नाडकर्णी, सर्फराज नाईक, संजय भोगटे आदींसह नागरीक उपस्थित होते.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या चौपदरीकरणाचे काम केंद्र शासना अंतर्गत सुरू आहे. या चौपदरीकरणाचे काम दिलीप बिल्डकॉन ही ठेकेदार कंपनी करीत आहे. कुडाळ तालुक्यात महामार्गावरील बऱ्याच ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.अलीकडेच कुडाळ भंगसाळ नदी ते पिंगुळी दरम्यानच्या कामाला गती मिळालेली आहे. खोदाई सुरू असून दिलीप बिल्डकॉनच्या माध्यमातून कामाला गती मिळालेली आहे. काही ठिकाणी खोदाई करत असताना सदर जागेचे मालक यांना कोणतीही नोटीस न बजावता तसेच त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसल्यामुळे याठिकाणी खोदाई काम जमीन मालकाने रोखलेले आहे. दरम्यान आज हा महामार्ग चौपदरीकरण होत असताना भविष्यात मोठया अपघाताची मालिका याठिकाणी होऊ शकते याठिकाणची अपघाताची मालिका कुठेतरी थांबावी बहुतांशी गावात जाताना रस्ता ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात विशेष म्हणजे शाळा कॉलेजमधून जाणारी मुले, दुचाकी वाहनांची वाढती संख्या आणि या धोकादायक महामार्गावर वेगात येणाऱ्या गाडीकडे दुर्लक्ष करून जाणारी व्यक्ती असेल तर ती निश्चितच अपघाताला कारणीभूत ठरणार आहे.

कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत चौपदरीकरण होत असतानाच आरएसएन हॉटेल ते राज हॉटेल दरम्यान फ्लाय ओव्हर ब्रिज होणे गरजेचे आहे.याबाबतच्या तीव्र भावना या बैठकीत उमटल्या.या बाबत निकषाला धरून कार्यवाही न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारासुद्धा देण्यात आला. विशेष म्हणजे कुडाळचा हा प्रश्न सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून भविष्यात कोणतेही धोके उद्भवू नयेत अपघाताची मालिका याठिकाणी होऊ नये ह्या अनुषंगाने पूर्वीच्या मागणीप्रमाणे ज्या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिजची मागणी आहे त्याची कार्यवाही झाली पाहिजे.यासाठी सर्वपक्षीय त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा या गंभीर बाबीची दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.लवकरच याबाबत जिल्हाधिकारी तसेच दिलीप बिल्डकॉनचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याशी याबाबत चर्चा करून नेमकी वस्तुस्थिती काय? याबाबतचा आढावा लवकरच घेण्यात येणार आहे असे यावेळी ठरविण्यात आले.