
आक्रोश, रडारड आणि उपस्थितांच्या गंभीर मुद्रा, एकूणच मन हेलावून टाकणारा प्रसंग आज स्मशानभूमीत पाहायला मिळाला. कुर्डुवाडी शहराच्या इतिहासात एकाच वेळी सातजणांचा अंत्यविधी करण्यात आला. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हे सर्व अंत्यविधी बाळाजी कोळेकर यांच्या सहकारी मित्रांनी पीपीई किट घालून उरकले. आज स्मशानही गहिवरले असेल, इतके भीषण चित्र होते.
कोरोनामुळे शहरातील विविध रुग्णालयांतील सात रुग्ण आज दगावले. या सर्वांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आले. मृतांच्या केवळ पाच नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांमध्ये शहरातील दोन व परिसरातील पाच व्यक्तींचा समावेश होता. कुर्डुवाडी स्मशानभूमीतील विदारक व मन हेलावून टाकणारी परिस्थिती पाहूनही आपण जर निर्बंध पाळणार नसाल, तर यापेक्षाही भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. किडय़ामुंग्यांसारखी चालता-बोलता माणसे मेलेली बघावी लागतील, अशा प्रतिक्रिया ही नागरिकांतून उमटत आहेत.
आज स्मशानभूमीत अनेक मृतदेहांचा अंत्यविधी झाला; पण तेथे हात-पाय धुवायलादेखील पाणी नव्हते. यासाठी नगरपालिका मुख्याधिकाऱयांना नागरिकांनी जाब विचारला.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोविड टेस्ट करून घ्यावी. अत्यावश्यक वगळता, इतर दुकाने उघडी दिसल्यास प्रथम दंड, तर दुसऱयांदा दुकाने सील केली जातील. नागरिक आणि व्यावसायिकांनी सहकार्य करावे.
– समीर भूमकर, मुख्याधिकारी, कुर्डुवाडी नगरपरिषद.


























































