बीएसएनएलच्या नो कनेक्टिव्हिटीचा बँक ग्राहकांना फटका! व्यवहार ठप्प, धनादेश परत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कोपरगाव

दोन दिवसांपासून कनेक्टिव्हिटी नसल्याने कोपरगाव मधील काही बँकांचे व्यवहार ठप्प झाले होते. बीएसएनएलमधील तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या ओढवली होती. बीएसएनएलमधील तांत्रिक बिघाडाच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे गेल्या सहा महिन्यांतील ही दुसरी तिसरी घटना आहे.

याबाबत बीएसएनएल बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. कनेक्टिव्हिटी नसल्याने बँक अधिकारी मात्र हतबल होऊन हात धरून बसले आहेत. धनादेश न वटल्यामुळे ग्राहकही हतबल झाला आहे. कधी तांत्रिक बिघाड, तर कधी कुठे केबल तुटल्यामुळे, बँकांचे व्यवहार ठप्प होतात आणि त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. मार्च महिना असल्याने बँकांची कर्ज, ठेवी, देणे, जीएसटी, इन्कम टॅक्स, असे सरकारी देणे या संबंधित धनादेशाची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण होत असते. मात्र नो कनेक्टिविटीमुळे सदरचे धनादेश परत जातात. त्यामुळे खात्यात बॅलन्स असून ग्राहकांना दंडात्मक कारवाईबरोबर मानसिक ताण सहन करावा लागतो. धनादेश न वटल्यामुळे विश्वासालाही तडा जात आहे.

या सर्वांमुळे धनादेश घेणारे आणि धनादेश देणारे या दोन्ही ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, याची तक्रार कुणाकडे करावी, यामुळे ग्राहकांची स्थिती मात्र हाक ना बोंब, मुक्याचा मार सहन करण्याची पाळी आली आहे. बँकेत चौकशी केली असता बेंगलोर वरून तात्पुरती कनेक्टिविटी जोडण्याचा प्रयत्न असून, अजून दोन-चार दिवस तरीही नो कनेक्टिव्हिटीचा त्रास राहणार असल्याचे समजते. याबाबत अधिकारीही काही बोलण्यास नकार देतात, अस का या प्रश्नांची चौकशी व्हायला हवी, अशी माहिती नागरिकांमधून होते आहे. गेले चार दिवस कनेक्टिव्हिटी नसल्याने कोपरगाव पीपल्स बँकेसह आदी बँकांमध्ये व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे अनेकांना मनस्ताप झाला. त्यासह काही ठिकाणी एटीएमही बंद पडल्याने नागरिकांना पैसे काढण्यासही धावपळ करावी लागली.