
कोविड-19 या संसर्गित रोगाची लागण होऊन मृत्यू झालेल्या लातूर जिल्ह्यातील 2 पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते सानुग्रह सहाय्य अनुदान म्हणून 1 कोटी रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सन 2020-21 या वर्षांमध्ये कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्ध लढाईत आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांच्या बरोबरीने गाव पातळीवरील पोलीस पाटलांनीही आपल्या प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले होते. कर्तव्य बजावत असताना पोलिसांसोबतच काही पोलीस पाटलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेल्या इतर शासकीय नोकरदारांप्रमाणेच गाव पातळीवर काम करणारे पोलीस पाटील यांच्या वारसदारांना सानुग्रह सहाय्य अनुदान म्हणून प्रत्येकी 50 लाख रुपये प्रदान करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता.
त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील पोलीस पाटील दिवंगत श्रीरंग गोविंदराव पाटील रा.नदीवाडी ता.निलंगा जि.लातूर, दिवंगत भागवत रामराव गुट्टे रा.येलदरवाडी ता.अहमदपूर जि.लातूर यांचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नमूद दिवंगत पोलीस पाटलांचा सानुग्रह सहाय्य प्रस्ताव पोलीस अधीक्षक लातूर यांच्या निर्देशान्वये पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक फुलचंद बनसोडे, प्रमुख लिपीक संभाजी कोलगणे, वरिष्ठ लिपीक राजेश्वर कुलकर्णी यांनी कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव सादर करून प्रत्येकी 50 लाख रुपयाची रक्कम मंजूर करून घेतली.
दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी कार्यालयात दोन्ही दिवंगत पोलीस पाटलांच्या वारस पत्नींना 50-50 लाख रुपयाचे धनादेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नमूद पोलीस पाटलांच्या वारसांना त्यांना भविष्यात काही अडचणी आल्यास लातूर पोलीस सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) अंगद सुडके, कार्यालय अधीक्षक फुलचंद बनसोडे, प्रमुख लिपीक संभाजी कोलगणे, वरिष्ठ लिपीक राजेश्वर कुलकर्णी, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते.
























































