
सामना प्रतिनिधी। लातूर
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्यावेळी मतदारसंघात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या 5 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत. तर 1100 होमगार्डचे सहाय्यही घेण्यात येत आहे. पेट्रोलिंगसाठी 110 वाहनांचा ताफा तयार ठेवण्यात आला आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येत आहे. 1883535 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 2075 मतदान केंद्रावर व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनानेही जोरदार तयारी केलेली आहे. 1 जिल्हा पोलीस अधिक्षक, 1 अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक, 12 उपविभागीय पोलीस अधिकारी, 22 पोलीस निरीक्षक, 114 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2286 पोलीस कर्मचारी, 1100 होमगार्ड बंदोबस्ताच्या कामी तैनात केले केले जात आहेत. राज्य राखीव दलाच्या 5 तुकड्यांचे सहाय्यही होणार आहे. पोलीस दलाच्या दृष्टीने 16 मतदान केंद्रे संवेदनशील तर 46 मतदान केंद्रे क्रिटीकल आहेत. तिथे अधिक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.


































































