मी निवडणुकीत गडबड केली, मला मृत्युदंडाची शिक्षा द्या! पाकिस्तानी अधिकाऱ्याची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानमधील निवडणुकीत अफरातफर झाल्याचं वृत्त असून एका वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याने यात आपला प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुली दिली आहे. याच अधिकाऱ्याने पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावरही निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे.

या अधिकाऱ्याचं नाव लियाकत अली चट्टा असं असून त्यांनी या प्रकारानंतर आपला राजीनामा दिला आहे. 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ पक्षाने निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला होता. त्याविरोधात आंदोलनालाही सुरुवात केली होती.

रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना चट्टा म्हणाले, निवडणुकीत जे उमेदवार पराभूत होत होते, त्यांना आम्ही विजयी केलं. या सर्व हेराफेरीची जबाबदारी मी घेतो. या सगळ्या प्रकारात मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सहभागी आहेत, अशी माहिती चट्टा यांनी दिली. या बाबत डॉन या वृत्तपत्रानेही वृत्त प्रकाशित केलं आहे.

आपण देशाच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळे मला रात्रीची झोपही येत नाही. मी जे चुकीचे काम केले, त्याची शिक्षा मला मिळाली पाहीजे. तसेच या गुन्ह्यात जे अन्य लोक सहभागी आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असं सांगताना चट्टा पुढे म्हणाले की, माझ्यावर खूप दबाव होता. ज्यामुळे मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर हिंमत करून त्यांनी जनतेसमोर सर्व सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली त्यांनी दिली आहे.