ब्रिटनमध्ये राजकीय संकट, लिझ ट्रस यांचा ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 45 दिवसातच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या महिन्यात ब्रिटन सरकारने एक आर्थिक योजना सादर केली होती. या योजनेच्या अपयशामुळे देशात आर्थिक गोंधळ आणि राजकीय संकट निर्माण झाले. यामुळे अर्थमंत्री बदलण्याव्यतिरिक्त, ट्रस यांना त्यांच्या अनेक धोरणांची उलथापालथ करावी लागली होती. सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचा राजीनामा आणि संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यांकडून तीव्र टीका झाल्यानंतर ट्रस यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

पंतप्रधान निवास कार्यालय 10 डाउनिंग स्ट्रीटच्याबाहेर ट्रस म्हणाल्या की, आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरलो आणि पक्षाचा आत्मविश्वास गमावला. त्या म्हणाल्या की, “मी माझी आश्वासने पूर्ण केली नाहीत हे मला मान्य आहे. यासाठी मी राजीनामा देत आहे.”

या राजीनाम्यामुळे ट्रस यांच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्या यूकेच्या सर्वात कमी कालावधी पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान बनल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम जॉर्ज कॅनिंग यांच्या नावावर होता, त्यांनी 1827 मध्ये 119 दिवस पंतप्रधान होते.

ट्रस यांच्या कार्यकाळात सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षात अनुशासनाची कमी होती. ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, असे कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे अनेक नेते सांगत होते. अखेर दबावानंतर ट्रस पायउतार झाल्या.