RBI कडून व्याजदर जैसे थे, EMI मध्ये बदल होणार नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या MPC ची बैठक तीन दिवसांनी म्हणजेच बुधवारी संपली. रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे कर्जाच्या हफ्त्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.

आज सकाळी 10 वाजता रिझर्व बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बैठकीत घेण्यात आलेले निर्णय जाहीर केले आहेत. MPC च्या तीन दिवसांची बैठक 5 एप्रिल रोजी सुरू झाली होती. रिझर्व्ह बँकने आर्थिक वर्ष 2021-22 साठी जीडीपी 10.5 टक्के राहील असा अंदाज कायम ठेवला आहे.

शक्तिकांत दास म्हणाले की, कोरोनाचा प्रादूर्भाव असून देखील आर्थिक स्थितीत सुधारणा पाहायला मिळत आहे. अर्थात पुन्हा ज्याप्रमाणात रुग्णांची वाढ झाली आहे ते पाहता अन‍िश्चितता वाढली आहे. मात्र देश आव्हानांशी दोन हात करण्यास सज्ज आहे. फेब्रुवारीमध्ये महागाई 5 टक्क्यांच्या उच्च स्तरावर राहून देखील रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेत राहिली आहे.

रिझर्व्ह बँकने रिव्हर्स रेपो रेट देखील 3.35 टक्क्यांवर कायम ठेवले आहेत. बँकांचे रेट देखील 4.25 टक्केच आहेत. रेपो रेट असा दर आहे ज्यावर बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज मिळते, तर रिव्हर्स रेपो दर म्हणजे ज्यावर रिझर्व्ह बँक आपल्याजवळ बँकांद्वारे जमा केलेल्या पैशांवर बँकांना व्याज देते.