
सुरत-हैदराबाद या ग्रीन एक्सप्रेस-वेसाठी जमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱयांना प्रकल्पग्रस्त शेतकऱयांनी विरोध केला. आमच्याशी वरिष्ठ अधिकाऱयांनी चर्चा करावी, मोबदला किती देणार ते स्पष्ट करावे, त्यानंतरच मोजणी होऊ दिली जाईल, असा इशारा आंदोलक शेतकऱयांनी दिला आहे.
राहुरी तालुक्यातील काही गावांमध्ये सुरत-हैदराबादची ग्रीन एक्स्प्रेस-वेची मोजणी सुरू झाली असली तरी खडांबा सडे परिसरात शेतकरी विरोध करीत आहेत. आज जमिनीची मोजणी करण्यासाठी मंडलाधिकारी दत्ता गोसावी, कामगार तलाठी कदम आलेले होते. भूसंपादन करावयाच्या शेतकऱयांना याबाबतच्या नोटिसा महसूल विभागाने बजावलेल्या होत्या. त्यानुसार दीडशे ते दोनशे शेतकरी खडांबे येथे हजर होते.
आंदोलकांसमोर बाबासाहेब धोंडे म्हणाले, ‘‘परिसरातील शेतकऱयांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी जमिनी दिलेल्या आहेत. तसेच मुळा धरण, इंडियन ऑइल प्रकल्पासाठीदेखील शेतकऱयांनी जमिनी दिलेल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या संपूर्ण पुनर्वसनाबाबत अनेक परिपत्रके निघाली. मात्र, पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. आमच्या जमिनीचा प्रत्यक्ष मोबदला आम्हाला किती मिळणार, हे स्पष्ट सांगितल्याशिवाय आम्ही जमीन मोजणी होऊ देणार नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची एकत्रित बैठक शासकीय कार्यालयात घेतली जावी. खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्थेच्या कार्यालयात बैठक घेतली. तसे न करता शासकीय कार्यालयात बैठक घ्यावी. प्रकल्पग्रस्तांच्या शंकांचे पूर्ण निरसन केले जावे. आजपर्यंत आठ प्रकल्पांसाठी आपण जमिनी दिल्या आहेत,’’ असे बाबासाहेब धोंडे यांनी सांगितले.
दौलत पवार म्हणाले, ‘‘महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी 76 एकर जमीन संपादित केली गेली व एका दिवसात आपण भूमिहीन झाल्याचे सांगितले. स्पॉट पंचनामे करून नुकसानभरपाई मिळाली पाहिजे व योग्य मोबदला मिळाल्याशिवाय शेतकरी जमिनी देणार नाहीत. शेतकरी मोजणी होऊ देणार नाहीत,’’ असा इशारा आंदोलकांनी दिला.
याशिवाय गोरख धोंडे, सुनील धोंडे, दगडू पवार, सुरेश धोंडे, सुरेश ताकटे, संजय ताकटे, अरविंद ताकटे आदींनी अधिकाऱयांशी चर्चेत भाग घेतला. पाच तासांच्या चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांचा विरोध पाहून मंडल अधिकारी यांनी मोजणी स्थगित केली. याबाबतचा अहवाल आपण वरिष्ठांना पाठवू असे त्यांनी सांगितले. आंदोलक शेतकऱयांच्या हरकतीचे लेखी पंचनामे करून चार वाजता मंडल अधिकाऱयांनी मोजणी स्थगित केली.

























































