खारकोपर-उरण मार्गावर आठवडाभरात लोकल 14 किलोमीटर अंतर, पाच स्थानके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुप्रतीक्षित खारकोपर-उरण मार्गावर आठवडाभरात लोकल ट्रेन धावणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून खारकोपर-उरण रेल्वे मार्गासह पाच स्थानकांचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर लोकल चालवण्याकरिता मध्य रेल्वेकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.

मध्य रेल्वेने बेलापूर-खारकोपर सुमारे 12 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे लोकसभा निवडणुकीआधी नोव्हेंबर 2018 मध्ये उद्घाटन करत लोकल सेवा सुरू केली आहे. या मार्गावर सध्या बेलापूर-खारकोपरदरम्यान 20 तर नेरूळ-खारकोपरदरम्यान 20 लोकल गाडय़ा चालवल्या जात आहेत. हाच मार्ग पुढे उरणपर्यंत जात असून रेल्वेने 14.6 किलोमीटर लांबीच्या दुहेरी रेल्वे मार्गिकेसह गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच रेल्वे स्थानके विकसित केली आहेत. जवळपास दीड हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केलेल्या या मार्गावर लोकल सेवा कधी सुरू होणार अशी विचारणा येथील नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे सदर रेल्वे प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठवडाभरात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेनेही त्याची पूर्वतयारी सुरू केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त

बेलापूर-खारकोपर या 12 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासह चार स्थानकांचे लोकार्पण लोकसभा निवडणुकीआधी नोव्हेंबर 2018 मध्ये झाले होते. त्यानंतर 2019 मध्ये एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. खारकोपर-उरण मार्गासाठीही लोकसभा निवडणुकीआधीचाच मुहूर्त निवडल्याचे दिसत आहे.