
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असले तरी त्याचा सर्वाधिक फटका मुंबईसह महाराष्ट्राला बसला आहे. उद्योगधंदे, दुकाने बंद राहिली आहेत. या आणीबाणीच्या परिस्थितीमध्येही विजेच्या वापरात मुंबई देशातील मोठय़ा 20 शहरांमध्ये नंबर वन राहिली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच सरकारने टप्प्याटप्प्याने उद्योग व्यवसाय सुरु करण्यास चालना दिली आहे. त्यामुळे मुंबापुरीचा वार्षिक सरासरी वीजवापर 21 हजार 900 दशलक्ष युनिट नोंदल्याचे केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. दुसऱया स्थानावर हैदराबाद असून त्यांचा वीज वापर 21 हजार 700 दशलक्ष युनिट एवढा आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या वतीने वेळोवेळी देशातील प्रमुख शहरांची विजेची मागणी आणि भविष्यात होणाऱया वाढीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार मुंबई आतापर्यंत वीज वापरामध्ये देशात एक नंबरवर राहिली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे तीन-चार महिने बंद असलेले उद्योगधंदे, व्यवसायांमुळे मुंबईच्या सरासरी वीज वापरात मोठी घट होईल अशी भीती होती. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच राज्य सरकारने यशस्वीपणे टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवल्याने मुंबईच्या घटलेल्या वीज वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईचा सरासरी वीज वापराचा नंबर वन कायम राखणे शक्य झाले आहे.
2024-25 मध्ये स्थान घसरणार
आतापर्यंत वीज वापरामध्ये नंबर वन असलेली मुंबई 2024-25 मध्ये दुसऱया स्थानावर जाईल असे केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. मुंबई शहरातील उद्योग मुंबई बाहेर जात आहेत. त्याचा विजेच्या मागणीवर परिणाम होणार आहे. आतापर्यंत वर्षाला पाच-सात टक्क्यांनी वाढणारी मुंबईची विजेची मागणी 2024-25 मध्ये केवळ 2.37 टक्के एवढी कमी प्रमाणात वाढणार असल्याने ती 24 हजार 709 दशलक्ष युनिटपर्यंत जाणार आहे. तर हैदराबादच्या विजेच्या मागणीत 6.63 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याने सर्वाधिक वीज वापराचे शहर म्हणून हैदराबाद पुढे येईल असेही आकडेवारीवरून दिसत आहे.




























































