मुंदडांची मनधरणी यशस्वी, राजकीय भूकंप टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई

गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजप-शिवसेना महायुतीमध्ये प्रवेश करण्यासाठी रिघ लागली आहे. अशातच बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बडे प्रस्थ राज्याच्या माजी आरोग्यमंत्री स्व. विमलताई मुंदडा यांचे पती नंदकिशोर मुंदडा आणि चिरंजीव अक्षय मुंदडा यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून तातडीने कार्यकर्त्यांची बैठक बोलावल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकच धावपळ उडाली. आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे जातीने अंबाजोगाईत दाखल झाले. त्यानंतर मुंदडा कुटुंबियांची मनधरणी केली. त्यात सोनवणेंना यश मिळाले आणि बीड जिल्ह्यातील अजून एक मोठा राजकीय भूकंप टळला.

बीड : राष्ट्रवादीला मोठा धक्का, मोहन जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने राष्ट्रवादीला हादरे देण्यास सुरूवात केली. अनेक नेते भाजपाच्या दिशेने निघाले. त्यातच केज मतदारसंघाचे बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे मुंदडा कुटुंब राष्ट्रवादीपासून अलिप्त होते. अंतर्गत गटबाजी आणि विश्वासात घेत नसल्याने ते नाराज होते. रविवारी मुंदडा यांनी तातडीने आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अंबाजोगाईमध्ये बोलावली. या बैठकीमध्ये निर्णय घ्यायचा असे पक्के ठरले. याची कुणकुण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना लागली आणि त्यांनी अंबाजोगाईमध्ये धाव घेतली. दोन तास चाललेल्या कथ्याकुटानंतर राज्याच्या माजी आरोग्यमंत्री स्व.विमलताई मुंदडा यांचे पती नंदकिशोर मुंदडा आणि पुत्र अक्षय मुंदडा यांची मनधरणी करण्यामध्ये राष्ट्रवादीला अखेर यश मिळाले.