
सामना ऑनलाईन । सातारा
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना विविध पक्षांमधील अंतर्गत कलह देखील समोर येत आहे. याच दरम्यान, वाई-सातारा मतदार संघातील काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले यांनी हाताची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भोसले यांनी भाजमध्ये प्रवेश केला.
किसन वीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन भोसले यांनी याआधीच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. आपल्या भवितव्यासाठी आणि कारखान्यांच्या सभासद हितासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची अपेक्षा मदन भोसले यांनी व्यक्त केली होती. अखेर शनिवारी त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसवर होते नाराज
लोणंद येथील काँग्रेसच्या मेळाव्यास मदन भोसले यांना डावलल्याबद्दलही सर्वांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचा तालुक्याचा मेळावा असताना मदन भोसले यांना बोलावले नाही, असा नाराजीचा सूर यावेळी उमटला होता. वाद वाढल्यानंतर आमदार जयकुमार गोरे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वत: या चुकीबद्दल माफी मागितली होती.
2014 ला पराभव
2014 ला झालेल्या निवडणुकीमध्ये मदन भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव सहान करावा लागला होता. राष्ट्रवादीचे मकरंद जाधव-पाटील यांनी मदन भोसले यांचा जवळपास 40 हजार मतांनी मोठा पराभव केला होता.


























































