Lok sabha 2019 सेहवागने भाजपची उमेदवारी नाकारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग भाजपकडून लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सेहवागने भाजपची उमेदवारी नाकारली आहे. वैयक्तीक कारणांचा हवाला देत सेहवागने भाजपकडून मिळणाऱ्या उमेदवारीला नकार दिला आहे. याबाबत दिल्ली भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी विरेंद्र सेहवाग पश्चिम दिल्ली लोकसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढणार अशी चर्चा होती. याची जबाबदारी दिल्लीतील एका वरिष्ठ नेत्याकडे सोपवण्यात आल्याचेही वृत्त होते. परंतु आता सेहवागने वैयक्तीक कारणांचा हवाला देत भाजपची ऑफर नाकारली आहे. ‘सेहवाग राजकारणामध्ये सध्या पाऊल ठेवण्यासाठी उत्सुक नाही’, असे विधान सेहवागने उमेदवारी नाकारल्याने भाजप नेत्याने केले आहे.

सेगवाग नाही पण निवडणुकीसाठी गौतम ‘गंभीर’
विरेंद्र सेहवागने निवडणूक लढण्यास नकार दिला असला तरी त्याचा माजी साथिदार गौतम गंभीर मात्र राजकारणामध्ये पाऊल ठेवण्यासाठी उत्सुक दिसत आहे. गंभीरने लोकसभा निवडणुकीसाठी होत असणाऱ्या बैठकींमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. परंतु गंभीरने मात्र या सर्व अफवा असल्याचे म्हटले.

दिल्लीमध्ये 12 मे रोजी मतदान होत आहे. त्यापूर्वी जाहीर होणाऱ्या भाजपच्या यादीमध्ये गंभीरच्या नावाचा समावेश होतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.